crime (फोटो सौजन्य: social media )
बीड: बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमानुष मारहाण आणि अपहरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव नागनाथ नन्नवरे असे आहे. ही घटना बांगरनाला, गोरे वस्ती येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नागनाथ यांना लाठ्या- काठ्यांनी अमानुष मारहाण करून एका चारचाकी वाहनातून पळवून नेण्यात आले.
नेमकं काय घडलं?
नागनाथ नन्नवरे हे आपल्या नातेवाईकाच्या चऱ्हाटा फाटा येथील घरी गेले असताना ही घटना घडली. अचानक आरोपी आले आणि बेदम मारहाण केली आणि गाडीत बसवून पळून गेले. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
गुन्हा दाखल
ही घटना घडल्यानंतर नागनाथ नन्नवरे यांची पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी तीन व्यक्तींसह इतर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणमागे आपल्या 11 वर्षांपूर्वी सोडलेल्या पहिल्या पतीचा हात असल्याचा संशय दिया नन्नवरे यांनी व्यक्त केला आहे.
तपास सुरु
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. रात्रीपासूनच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आरोपींना ओळखणे पोलिसांसाठी सोपे होऊ शकते. या प्रकरणातील सत्य काय आहे आणि अपहरणामागचे खरे कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.
बीड जिल्ह्यातील तणावाची स्थितीपाहता मनाई आदेश लागू
बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या मागचं कारण असं की जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकारण. बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा मनाई आदेश २५ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. समाज माध्यमातून होणाऱ्या पोस्टचे पडसाद रस्त्यावर होऊ लागले आहेत. तर बॅनरबाजीमुळेही अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, नवरात्र उत्सवाची सुरुवात या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी आजपासून(13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतील. अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी दिली आहे.
शासन निर्णया संबंधित आदेश
या मनाई आदेशादरम्यान, काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास शस्त्र, सोटे, काठी, बंदूक आदी वापरण्यास परवानगी नाही.