सौजन्य - सोशल मिडीया
पाटस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दहावीच्या विद्यार्थिनीला उडवले. मात्र या अपघातात ती विद्यार्थिनी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या एका पायाला मात्र मोठी दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी ( दि १०) सायंकाळी कुरकुंभच्या वर्दळ असलेल्या चौकात घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि संतप्त ग्रामस्थांनी वाहन चालकाला चांगलाच चोप दिला आहे. मात्र त्या ठिकाणी मळद आणि कुरकुंभ परिसरात बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या एका माफीयाने वाहन चालकाची काय चूक नाही, त्या मुलीची चूक आहे असे सांगितले. आणि मग मात्र संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाहन चालकाचा मोर्चा थेट या मुरूम माफियावरच वळवला. भर चौकात त्याची चांगलीच धुलाई केली.
दौंड तालुक्यात खडी आणि बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करीत हायवा डंपरने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हा उच्छाद नेमका कोणाच्या आर्शिवादाने, कोणाच्या जीवावर चालला आहे? या मागे कोण आहे?, यांनी माणसं मारण्याचे लायसन्सच हे क्रेशर खडी आणि बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या मालक आणि चालकांना दिले काय? असा सवाल आता ग्रामस्थ करीत आहेत. अष्टविनायक महामार्गावरील देऊळगाव गाडा आहे. तेथे एका खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दुचाकीला चिरडलं, यामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असताना कुरकुंभमध्ये वर्दळ असलेल्या चौकात डंपरने दुचाकीवरुन घरी जात असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनीला उडवले. मात्र या अपघातात ती थोडक्यात बचावली आहे.
डंपरवर आळा बसवण्यासाठी दौंड पोलीस अपयशी
मागील महिन्यात खडी क्रशर आणि हायवा वाहनचालक आणि मालकांची एक बैठक कुरकुंभ पोलीस मदत केंद्रात दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि काय निर्णय घेण्यात आला ? ही बैठक घेऊन काय साध्य झाले. कारण या बेकायदा मुरूम उत्खनन आणि नियमांचे उल्लंघन करून वाहतुकी करणाऱ्या डंपरवर आळा बसवण्यासाठी दौंड पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. ही बैठक नेमकी वाहन चालकांना कायदा आणि नियमांचे पालन करण्यासाठी होती का हप्ते वाढवण्यासाठी होती ? असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत.दरम्यान, हा अपघात झाल्यानंतरही दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.