लखनौ : स्वातंत्र्य दिनापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांना बॉम्बने (Bomb Attack) उडवून देण्याची धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश एटीएसने (Uttar Pradesh ATS) दहशतवादी कट रचणारा इसिसचा दहशतवादी सबाउद्दीन आझमी (ISIS Terrorist Sabauddin Azmi) याला आझमगडमधून अटक केली आहे. संशयित दहशतवादी इसिसमध्ये भरती करणाऱ्यांच्या थेट संपर्कात होता आणि राजकीय पक्षाच्या नावाखाली दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.
उत्तरप्रदेश एटीएसचे एडीजी नवीन अरोरा यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन यूपी एटीएस कट्टरपंथी घटकांवर नजर ठेवून आहे. आझमगडच्या अमिल्लो मुबारकपूरमध्ये इसिसचा सबाउद्दीन आझमी हा त्याच्या साथीदारांमार्फत जिहादी विचारसरणीचा प्रसार व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सद्वारे करत असल्याची माहिती मिळाली. तसेच, तो इतर लोकांना इसिसशी जोडण्याची मोहीम चालवत होता.
आरोपी सबाउद्दीनचा मोबाइल डेटा तपासल्यानंतर असे आढळून आले की तो अल-सक्र (AL-SAQR) मीडिया या टेलिग्राम चॅनेलशी संबंधित आहे. सबाउद्दीनने सांगितले आहे की, तो बिलाल नावाच्या व्यक्तीशी फेसबुकवर कनेक्ट होता. बिलाल त्याच्याशी जिहाद आणि काश्मीरमध्ये मुजाहिदांवर होत असलेल्या कारवाईबद्दल बोलत असे. चर्चेत बिलालने मुसा उर्फ खट्टाब काश्मिरी हा इसिसचा सदस्य असलेला नंबर दिला, त्यावरून सबाउद्दीन बोलू लागला. काश्मीरमध्ये मुजाहिदांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी मुसाने सध्या सीरियात असलेल्या इसिसच्या अबू बकर अल-शमीचा नंबर दिला होता.