
आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा
छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील गट क्रमांक १८४ मधील जमीन २०१७ मध्येच अदलाबदल पत्राने दुसऱ्याला दिलेली असताना, त्याच जमीनीचा पुन्हा विक्रीचा व्यवहार करुन आयटी कंपनीत काम करणाऱ्या 62 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी फरहत उल्ला खान, वजाहत उल्ला खान आणि मिर्झा जफर वेग मिर्झा आझम बेग या दोघांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात शेख शेरजील मोहम्मद शफीक (वय ३५, रा. पडेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, शेरजील हे आयटी कंपनीत नोकरी करतात. एप्रिल २०२५ मध्ये कसाबखेडा येथे त्यांची फरहत उल्ला खान याच्याशी भेट झाली. त्यावेळी फरहत उल्ला खान याने वेरूळ येथील गट क्रमांक १८४ मध्ये स्वतःच्या मालकीची १ हेक्टर ८० आर, तर मुलाच्या नावावर २० आर जमीन असल्याचे सांगून ती विकायची असल्याचे सांगितले. जमीन पाहिल्यानंतर शेरजील, त्यांचे वडील आणि भाऊ यांनी ती खरेदी करण्याचे ठरविले.
2017 मध्येच जमीन विक्री
व्यवहारासाठी सुरुवातीला तीन हजार रुपये रोख बयाना देण्यात आला. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी शेरजील, त्यांचे वडील, आई आणि भावाच्या खात्यांतून चेक व आरटीजीएसद्वारे रक्कम देण्यात आली. सचिन पोपटराव चव्हाण, पोपटराव चव्हाण तसेच फहत उल्ला खान आणि फरहत उल्ला खान यांच्या नावावर टप्प्याटप्प्याने पैसे देण्यात आले. अशाप्रकारे एकूण ६२ लाख रुपये देण्यात आले.
तक्रारीत काय म्हटले?
दरम्यान, व्यवहारातील जमीन फरहत उल्ला खान याने २०१७ मध्येच सातारा येथील शकीलखान अन्वरखान पठाण यांना अदलाबदल पत्राद्वारे दिल्याची माहिती शेरजील यांना मिळाली. त्यानंतर शेरजील यांनी शकील पठाण यांच्याकडे चौकशी केली असता २०१७ मध्येच वेरूळ गट क्रमांक १८४ मधील १ हेक्टर ८० आर जमीन अदलाबदल पत्राद्वारे घेतल्याचे सांगितले. सध्या जमिनीचा सातबारा शकील पठाण यांच्या नावावर असल्याचे तक्रारीत नमूद आहे.