पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 'या' भागातून महिलांचे दागिने हिसकावले
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे नागरिकांसोबतचं पोलीसही हेराण झाले आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पादचारी तसेच प्रवास करणाऱ्या महिलांना चोरट्यांनी टार्गेट केले असून, विश्रांतवाडी तसेच खराडी भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावून चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना विश्रांतवाडीतील टिंगरेनगर येथे घडली असून, पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या. त्या विद्यानगर परिसरातील गल्ली क्रमांक ११ मध्ये आल्यानंतर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या पाठिमागून येत गळ्यातील मंगळसूत्र चोरुन नेले. महिलेने आरडाओरडा केला. पण, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.
तर खराडीतील गेरा एमरल्ड सोसायटीजवळ दुचाकीस्वाराच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार खराडीत राहतात. ते ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. सहायक निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर अधिक तपास करत आहेत.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरांची हिंमत वाढली; ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली