संग्रहि्त फोटो
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता वानवडीतील लुल्लानगर परिसरात नातवाला स्कूल बससाठी सोडायला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यासह भारती विद्यापीठ येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले आहे.
पहिली घटना वानवडीतील लुल्लानगर परिसरातील कुबेरा पार्क येथे घडली असून, याप्रकरणी ७६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, वानवडी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चार फेब्रुवारीला सकाळी साडेसहा ते पावणेसात या दरम्यान घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कुबेरा पार्क येथे राहायला आहेत. सकाळी नातवाला शाळेच्या बसपर्यंत सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून दोघे जण आले. त्यातील एकाने तक्रारदाराच्या गळ्यातील १ लाख ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली आणि पसार झाले.
दुसरी घटना कात्रज तलाव परिसरात घडली आहे. एका ४८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास तक्रारदार या कात्रज तलाव परिसरात फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी दोघांनी पाठीमागून त्यांचे ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून ते दुचाकीवरुन पसार झाले.
हे सुद्धा वाचा : बिबवेवाडीत ’70’ वाहने फोडली; दहशत माजविण्यासाठी…; एका रात्रीत उतरवला गुंडांचा माज
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबवले
गेल्या काही दिवसाखाली कोयना वसाहत (ता. कराड) येथील कोयना वसाहत ते जखिणवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धुम स्टाईल लांबवले आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.