
कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
खडेगोळवली परिसरातील ओम महेश सोसायटीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी एका बिल्डरकडे इमारतीच्या विकासाचे काम सोपवले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष विकासकाम सुरू झाले नसल्याचा आरोप काही रहिवाशांनी केला आहे. याच पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान वाद वाढत जाऊन हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रहिवासी दीपक म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार वर्षांपासून इमारतीचे विकासकाम झालेले नाही. सध्याच्या बिल्डरकडून हे काम दुसऱ्या बिल्डरकडे देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रक्रियेला आपण विरोध केल्यामुळे बिल्डर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे.
दुसरीकडे, बिल्डर सुरज पावसे यांनी दीपक म्हात्रे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. विकासाचे काम दुसऱ्या बिल्डरच्या माध्यमातून करून घेण्यात येत असून ही प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच विकासासाठी असलेली मुदत अद्याप संपलेली नसून रहिवाशांमध्येच काही मतभेद असल्याचे पावसे यांनी म्हटले आहे.
रहिवाशांना दहा महिन्यांचे थकीत भाडे देण्यात आल्याचेही पावसे यांनी सांगितले. बैठकीदरम्यान दीपक म्हात्रे यांनीच आपल्यावर हल्ला केल्याचा उलट आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत.
या वादानंतर प्रकरण कोळसेवाडी पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून नेमका वाद कसा सुरू झाला, हाणामारीत कोणाचा सहभाग होता आणि पुनर्विकासाच्या वादाची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्…