
केतन हत्याकांडात बचाव पक्षाचा मोठा दावा
पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसून पोलिसांकडे ठोस पुरावेही नाहीत, असा दावा आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्या वकिलांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि मोबाईल चॅटच्या आधारे दोघांची भूमिकाच स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या खटल्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
सिया गोयलची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाविरुद्ध कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा स्वतंत्र साक्षीदार नाही. सुरुवातीला हा अपघाती मृत्यूचा गुन्हा होता, नंतर त्याचे हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर करण्यात आले. फोनवर बोलणे किंवा कॅफेमध्ये भेटणे हे हत्येचे थेट पुरावे ठरत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाची मागणी; रहिवाशांचा कँडल मार्च
मावळ तालुक्यातील लोहगडावर केतन अग्रवालच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील रहिवाशांनी शनिवारी शांततेत कँडल मार्च काढला. ‘जस्टीस फॉर केतन अग्रवाल’सह विविध फलक हातात घेऊन नागरिकांनी निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या रहिवाशांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत शांत, संयमी आणि संघटित आंदोलनातून केतनला न्याय मिळावा, अशी एकमुखी भूमिका मांडली.
डोके ठेचलेले होते
केतनचा मृतदेह बाहेर काढणारे सुनील गायकवाड यांनी सांगितले की, केतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, कवटी ठेचलेली होती तसेच हात-पायांवरही अनेक जखमा होत्या. इतर लोक मदतीसाठी आक्रोश करत असताना सिया मात्र शांत उभी होती, असा दावा त्यांनी केला. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, घटना घडल्याच दिवशी कुटुंबाला सियावर संशय आला होता.
डिजिटल चॅटवर पोलिसांचा भर
या प्रकरणात पोलिसांचा तपास मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुराव्यांवर आधारित आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांनी पकडले जाण्याच्या भीतीने व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवरील चॅट, कॉल लॉग आणि रिसायकल बिनमधील माहितीही हटवली होती. लोणावळा पोलिसांचे फॉरेन्सिक पथक हा हटवलेला डेटा पुनर्प्राप्त करण्याचे काम करत आहे.
सियाच्या भावाची १० तास चौकशी
लोणावळा पोलिसांनी शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल याची सलग दहा तास चौकशी केली. साहिलने पोलिसांना सांगितले की, सियाने कधीही घरच्यांसमोर केतनशी लग्नाला विरोध केला नव्हता. तिने विरोध दर्शवला असता, कुटुंबाने तिच्या इच्छेनुसार दुसरीकडे विवाह लावून दिला असता. त्याने पुढे सांगितले की, चेतन चौधरी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असे. साहिलही क्रिकेट खेळत असल्याने दोघांची मैत्री झाली. त्यानंतर स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या सियाची चेतनशी ओळख झाली.
न्यायालयीन कोठडीची मागणी करणार
आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, न्यायालयात सियासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाईल. पोलिसांनी कोठडीची मागणी केल्यास त्यामागील गरज न्यायालयासमोर सिद्ध करावी लागेल. दुसरीकडे, पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन तोणपे यांनी तपास वेगाने सुरू असून, या हत्येत सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची भूमिकाही तपासातून स्पष्ट झाल्याचा दावा केला.