कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरच होणार; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर : गेली अनेक वर्ष रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांना, शहराशी एकरूप झालेली गाव हद्दवाढीमध्ये घ्यावीत, अशा पद्धतीचे पत्र दिले जात आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या आयुक्त जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना विनंती करून संबंधित ग्रामपंचायतींना सदरची नोटीस काढतील. त्यानुसार संबंधित गावांची भूमिका आल्यानंतर हा प्रस्ताव शासनाला सादर होईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत केवळ 29 टक्के जलसाठा; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम
हद्दवाढ ही काळाची गरज असून, ती जर झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा आमचे दुश्मन नसून त्यांना विश्वासात घेऊनच त्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे. हीच भूमिका असल्याचे सांगून हा विषय कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून आपण जिल्ह्यात एकत्र राहणारी मंडळी जिल्ह्याच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे.
तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ काही दिवसातच होईल, अशी अपेक्षा आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
हेदेखील वाचा : Air India Crash : एअर इंडिया विमान अपघातात खळबळजनक दावा, कर्मचाऱ्यांनी वर्षभरापूर्वी बोईंगमध्ये तांत्रिक बिघाडाची दिली होती माहिती