परभणीच्या येलदरी धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा; पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा (File Photo : Dam)
बीड : राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे नद्या, धरणे भरतही आहे. त्याच्या पाणीसाठ्यात वाढही होत आहे. त्यातच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात 29 टक्के पाणीसाठा असून, या विभागास मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यात या पावसाळ्यात आतापर्यंत फक्त 1 टीएमसी पाणी जमा झाले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. त्यामुळे इतर धरणांची पाणी पातळी वाढली असली तरी वळवाच्या पावसानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली. जायकवाडीतून जालना, बीड, धाराशिव, परभणी तसेच वाळूज येथील उद्योजकांना पाणी दिले जाते. मागील वर्षी या धरणात जूनमध्ये ३५ टक्के पाणीसाठा होता. मात्र, एप्रिल व मेच्या पहिल्या आठवड्यात या धरणातील पाणी पातळी कमी झाली. तसेच मृग नक्षत्राचे आगमन झाल्यावर ते कोरडे गेले.
नाशिक परिसरात जोरदार पाऊस झाल्यावर गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. तिच्यासह गंगापूर, दारणा धरणातून वेगाने हे पाणी जायकवाडीत दाखल होते. मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यावर जायकवाडीच्या धरणात एकूण ४८.९३५३ टीएमसी म्हणजे ४७.६३ टक्के पाणीसाठा असला तरी त्याची उपयुक्तता २२.८६९० टीएमसी व २९.८३ टक्के अशी होती.
बाष्पीभवनाची समस्या कायम
पिण्याच्या पाण्याचे बाष्पीभवन होणे ही समस्या धरणात उन्हाळ्यात कायम राहिली. या धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने त्याची पाणी साठवण क्षमता १०१ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या एका संस्थेने दिला होता. पण गेल्या १२ वर्षात त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे.
जायकवाडीची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसी
जायकवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. याच धरणाला नाथसागर जलाशय म्हणूनही ओळखले जाते, हे मराठवाड्यातील एक प्रमुख धरण आहे. ते आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.
मराठवाड्यातील 11 प्रकल्पांमध्ये 34.62 टक्के पाणीसाठी
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात ३४.६२ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. निम्न दुधना प्रकल्पात ३६.६८ टक्के, येलदरीत ५०.६१ टक्के, सिद्धेश्वरमध्ये २३.२७ टक्के, मांजरामध्ये २५.८५ टक्के तर पेणगंगात ४३.६ टक्के व मानारमध्ये ४१. ६१ टक्के पाणीसाठा आहे.