चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; 'या' भागात सापळा रचून पकडले
जयसिंगपूर : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत उमळवाड फाटा, जयसिंगपूर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे.
त्याच्याकडून ३७ ग्रॅम चरस आणि इतर साहित्य असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
अंमलदार महेश पाटील व महेश खोत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे (वय ३९, रा. उमळवाड) हा चरस विक्रीसाठी उमळवाड फाटा येथे येणार आहे. त्यानुसार हॉटेल जमजम जवळ सापळा रचून संशयिताला पकडण्यात आले. अंगझडतीत त्याच्या कब्जातून ३७ ग्रॅम चरस व साहित्य मिळून आले. पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.
अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अमंलदार महेश पाटील, महेश खोत, संजय कुंभार, शुभम संकपाळ, लखन पाटील, संजय पडवळ, अशोक पवार, सुशिल पाटील, राजेश राठोड अनिल जाधव यांनी ही कारवाई केली.
एनडीपीएस कायद्याननूसार गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, त्याने चरस कोठून आणला याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर, शाहूपुरी, राजारामपूरी आणि जयसिंगपूर येथे एकूण चार गुन्हे नोंद आहेत.