कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई सुरुच; एकाच दिवशी...
कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यासाठी एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेमध्ये गांजा सेवन, मटका जुगार, मावा विक्री आणि ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ अशा एकूण 8 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून 8 आरोपींना अटक करत कारवाई केली.
गोठणपूर येथील पवन दत्तात्रय काळे (रा. गोठणपूर) याला कुरुंदवाड येथील भाजी मंडई परिसरातून गांजा सेवन करताना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून चिलीम, गांजा व तंबाखू जप्त केली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाड (ता. शिरोळ) येथील सार्वजनिक रस्त्यावर मटका जुगार सुरु असताना निर्माण कांबळे व बाबासाहेब पाटील यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या असून, दोघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur News : कुरुंदवाडमध्ये अवैध धंद्यांवर मोठी कारवाई; 38 माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारीसह मुद्देमाल जप्त
माळभाग येथील राधे पान शॉपवर छापा टाकून दुकानमालक दत्तात्रय सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानातून सुगंधी तंबाखू आणि सुपारीचे एकूण ५० पुड्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. वाहन चालवताना मद्यपान केल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर कारवाई करत संबंधित चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
एकदिवसीय मोहिमेत 8 गुन्हे दाखल
या एकदिवसीय मोहिमेत ८ गुन्हे नोंदवले गेले आहेत सागर खाडे, राजेंद्र पवार, नितीन साबळे, बाळासाहेब कोळी, अनिल चव्हाण, ज्ञानदेव सानप, विवेक कराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मागील बुधवारीही झाली कारवाई
दुसऱ्या एका घटनेत, कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलिस ठाण्याने बुधवारी (दि.९) सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन पानटपऱ्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई केली आहे.