
मावळ तालुक्यात लेडीज डान्सबार खुलेआम सुरु; मध्यरात्रीपर्यंत लाखोंची उधळण
पुणे–मुंबई जुन्या महामार्गावरील कान्हे फाटा ते कामशेत पट्ट्यात मुख्य रस्त्यालगत तीन डान्स बार राजरोसपणे सुरू आहेत. रोज लाखो रुपयांची उधळण सुरू आहे. मात्र ग्रामीण पोलिसांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री पर्यंत सुरु असणाऱ्या या बारला प्रोटेक्शन कोणाचं आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती नसणे हे आश्चर्यकारक आहे.
स्टींग ऑपरेशनमध्ये अश्लील नृत्याचे कार्यक्रम आणि मुलींवर ग्राहकांकडून उधळली जाणारी लाखो रुपयांची रोकड उघड झाली आहे. ऑर्केस्ट्रा बार या नावाखाली चालणाऱ्या या बारमध्ये मद्यविक्रीसोबतच मुलींचे अश्लील नृत्य सुरू असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. बारमध्ये नृत्य करणाऱ्या मुलींची संख्या किमान २५ ते ३५ तरुणी असून, त्या ग्राहकांच्या समोर तोकड्या कपड्यांत नृत्य करताना दिसतात.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत सुरु असणाऱ्या खुलेआम डान्स बारवर पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील हौशीची गर्दी पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या या ठिकाणी शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गुन्हेगार येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठे काही तरी घडू शकते.
सध्या हे डान्सबार म्हणजे नवे पनवेल बनले आहेत. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड व पुण्यातील तरुण सहभागी होत असल्याने गुन्हेगारी वाढण्याचा धोका वाढला आहे. अश्लील नृत्य, मोठ्या प्रमाणातील मद्यसेवन आणि मध्यरात्रीनंतरही सुरू राहणारा धिंगाणा यामुळे महामार्गावर अपघातांचा धोका निर्माण होत आहे.
सध्या नागपूर येथे विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असल्याचे सांगत चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही, मावळ तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र याच्या पूर्ण विरुद्ध असल्याचे दिसून येते. मुख्य महामार्गालगत अगदी उघडपणे चालणाऱ्या या बारकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी काही महिन्यांपूर्वीच या परिसरात कुठल्याही अवैध धंद्याला समर्थन दिले जाणार नाही, अशी कठोर भूमिका जाहीर करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. परंतु प्रत्यक्षात मावळ आणि लोणावळा परिसरात डान्स बार, मटका, आणि बेकायदेशीर रिसॉर्ट पार्ट्यांसह अनेक अवैध उद्योग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा येथील पदभार स्वीकारल्यानंतर लोणावळा, कार्ला, पवनानगर, वडगाव मावळ, कामशेत या परिसरातील अवेध धंद्यावर कारवाई केली. यामध्ये वडगाव येथील दोन डान्स बारवर, वेश्या व्यवसाय, विना परवाना दारू विक्री आणि फार्म हाऊसवर चालणाऱ्या पार्ट्या यावर नियंत्रण आणले होते. मात्र कार्तिक यांची बदली झाली आणि पुन्हा सर्व धंदे जोमाने सुरु झाले आहेत. आज मावळात खुलेआम सर्वकाही उपलब्ध होत आहे. त्यामुळे यावर पोलीस अधीक्षक किंवा विभागीय पोलीस अधिकारी कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कामशेत आणि वडगाव येथे सुरु असलेल्या डान्सबार आणि स्टिंग ऑपरेशन करुन केलेला व्हिडीओ या बाबत संबंधित पोलीस अधिकारी यांना विचारले असता याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.