पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील ड्रग्जप्रकरणात आतापर्यंत तब्बल ७ जणांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले असून, तिघांचे निलंबन केले आहे. पहिल्यांदाच शहर पोलिसांच्या इतिहासात एका प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात बडतर्फीची कारवाई झाली आहे.
दरम्यान, ड्रग्जप्रकरण समोर आल्यानंतर ससून रुग्णालयात उपचार घेणारा कैदी ललित पाटीलने पलायन केले होते. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. पोलीस हवालदार आदेश सिताराम शिवणकर आणि पोलीस शिपाई पिराप्पा दत्तु बनसोडे अशी बडतर्फ केलेल्या दोघांची नावे आहेत.
गेल्या वर्षी (२९ सप्टेंबर) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या गेटवर रुग्णालयातून बाहेर आणताना दोन कोटी १४ लाखांचे मेफेड्रोन हा ड्रग्ज पकडला होता. दुसऱ्याच दिवशी या कारवाईत येरवडा कारागृहात असलेला पण, आजारपणाचे कारण देऊन ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैदी ललीत पाटीलचा सहभाग समोर आला होता. त्यानंतर रुग्णालयातूनच ड्रग्ज रॅकेट चालविले जात असल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्याचवेळी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाला होता. तो पळाल्याने राज्यभरात हे प्रकरण चर्चेत आले.
नाशिक शहरातही ड्रग्जचे उत्पादन करून त्याची विक्री मुंबईत केली जात असल्याचे समोर आले होते. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पकडल्यानंतर या गुन्ह्याचा कसून तपास केला गेला. तेव्हा ललित पाटील रुग्णालयात राहूनही कोर्ट कंपनीच्या पोलीस व रुग्णालयाला मॅनेज करून तो पंचतारांकित हॉटेलांमध्ये त्याच्या मैत्रिणींना भेटत होता. तसेच, तो आरामात राहत असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल तत्काळ निलंबन कारवाई सुरू केली होती. याप्रकरणात १० जणांचे निलंबन केले होते.
चौकशीत यापुर्वी ५ जण दोषी आढळल्यानंतर त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. त्यानंतर शिवणकर व बनसोडे या दोघांच्या चौकशीत ललितला एक्स रे साठी घेऊन जाण्याची जबाबदारी असताना ते गेले नाही. तर, ललीत पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा दिली. घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास दिली असती तर पळून गेलेल्या ललीतला पकडता आले असते. परंतु या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळवल्यामुळे ललीत पाटील याला पळून जाण्यास वाव मिळाला, असे चौकशी मध्ये निष्पन्न झाले. त्यानूसार, या दोघांना बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. तर, तिघांचे निलंबन करण्यात आले आहे.