
crime (फोटो सौजन्य: social media)
भाईंदर (वा.) : मीरारोड परिसरातील मौजे मिरे येथील एका वादग्रस्त जमिनीवर अवैधरीत्या कब्जा करण्याच्या प्रयत्नाने खळबळ उडाली. काशीमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ३० महिला आणि पुरुषांना अटक केली आहे. यापैकी १२ आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून, उर्वरित १८ जणांना न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले आहे. या जमिनीवर ‘लीना ग्रुप’ या बांधकाम कंपनीचा आधीपासून ताबा आहे. त्यांनी जागेच्या सुरक्षेसाठी खास सिक्युरिटी गार्ड नेमले होते. मात्र या जमिनीच्या मालकीवर दुसऱ्या ‘नीरज वोरा’ नावाच्या बिल्डरचा दावा आहे. या दोन्ही बिल्डरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मालकीहक्काचा वाद सुरू आहे. पोलिस तपासानुसार नीरज वोरा आणि शिवा रमापती सिंह (शिवसेना-शिंदे गटाचे नेते विक्रमप्रताप सिंह यांचा भाऊ) यांचे संशयित आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपींच्या वापरातील कारही जप्त केली आहे. मौजे मिरे सर्वे क्रमांक ७२ या जमिनीवर शुक्रवार, सकाळी लीना ग्रुपचे सुरक्षा रक्षक ड्युटीवर होते. त्याचवेळी काही महिला व पुरुषांचा मोठा समूह त्या ठिकाणी पोहोचला.
धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…
सिक्युरिटी केबिन, सीसीटीव्हींची करण्यात आली तोडफोड
साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीने ‘जमिनीचे परीक्षण करायचे आहे’ या बहाण्याने दरवाजा उघडण्याची मागणी केली. सुरक्षा रक्षकांनी नकार दिल्यावर, त्या गटाने अचानक गेट तोडून आत प्रवेश केला. या दरम्यान आरोपींनी सिक्युरिटी केबिन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. काही मिनिटांतच ‘ही जमीन अल्को बिल्डर प्रायव्हेट लिमिटेडची आहे’ असा बोर्ड लावण्यात आला. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काशीमीरा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यांनी सर्व ३० आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली. नंदलाल चौरसिया, निलेश शिवदानी सिंह, रमेश सिंह, भूपेंद्र ललित मडवी यांसह सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता कलमांतर्गत हत्यारासह जमाव करणे, दंगल, मारहाण, शांतीभंग अशा गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, १२ जणांना जामीन मंजूर करण्यात आला. तर उर्वरित १८ आरोपींना न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले आहे.
शिवासिंह यांनी आरोप फेटाळले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, नीरज वोरा आणि शिवा सिंह या दोघानाही संशयित आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. त्यांची भूमिका सध्या तपासात असून, जर त्यांच्या सहभागाचे पुरावे सापडले, तर त्यांनाही अटक केली जाईल. दरम्यान, शिवासिंह यांनी माध्यमांशी बोलताना माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.