धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता व्यवसायासाठी ‘माहेरहून 3 लाख रुपये घेऊन ये, तसेच तुला घरकाम येत नाही, फारकत दे आणि मोकळी हो. नाहीतर तुझा आणि तुझ्या मुलींचा काटा काढेन’, ही धमकी देत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात सासरकडील मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायत्री (वय ३६) हिचा विवाह दीपक सुभाष हरिचंद्रे (वय ४३, रा एल-१७५, म्हाडा) याच्याशी झाला. पतीपासून तिला दोन मुली आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी गायत्रीला सुरुवातीचे सहा ते सात महिने कसेबसे नांदविले. त्यानंतर मात्र घरातील क्षुल्लक कारणावरून छळाला सुरुवात केली. ‘तुझ्या आई-वडिलांकडून व्यवसायासाठी 3 लाख रुपये घेऊन ये’ अशी मागणी करून पती दीपक हा शिवीगाळ करत असे. तसेच तुला घरातील काम येत नाही, तू आमच्या लायकीची नाही, असे म्हणून टोचून बोलून अपमानित करून शारीरिक व मानसिक छळ करत असे.
हेदेखील वाचा : Ratnagiri Crime : दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
तसेच नणंद संगिता केरे, तिचे पती बाळासाहेब कचरू केरे यांनी दीपक याला सांगितले की, ‘तू हिला घरातून हाकलून दे, मी तुला दुसरी मुलगी करून देतो’, असे म्हणून प्रोत्साहन देत. तसेच तुझा आणि तुझ्या मुलींचा काटा काढून टाकू अशी धमकी नणंद संगिता हिने दिली. याप्रकरणी गायत्री दीपक हरिचंदे या विवाहितेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात सासरकडील मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘वैष्णवी’नंतरही अनेक प्रकरणे समोर
दुसरीकडे, वैष्णवी हगवणेसारख्या प्रकरणानंतर कायद्याला म्हणावा तसा धाक लोकांना राहिलेला दिसत नाही. अशाच एका घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. दागिने आणि पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ तिच्या पतीकडून होत होता. पतीच्या जाचाला कंटाळून पीडितेने खाडीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली. त्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला.






