
7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
शिरूर पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एका तक्रारदाराच्या वडीलोपार्जित जमिनीचा पंचनामा आपल्या बाजूने करून देण्यासाठी तसेच पुढील कामात मदत करण्याच्या बदल्यात आरोपी लोकसेविका प्रमीला वानखेडे यांनी सुरुवातीला १० हजारांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दिनांक १६ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. या दरम्यान पंचासमक्ष तडजोडीअंती ७ हजारांची लाच स्वीकारण्याचे आरोपीने कबूल केले आहे. दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजून ६ मिनीटांनी न्हावरे–तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजी चौक येथे पंचासमक्ष ७ हजारांची लाच स्वीकारताना आरोपी ग्राम महसूल अधिकारी प्रमीला वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
कारवाईनंतर आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस उपअधिक्षक भारती मोरे करत आहेत. शासकीय कामासाठी लाच मागितल्याच्या या कारवाईमुळे शिरुर महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले
महिन्याला जवळपास ८० ते ९० हजार रुपये वेतन असणारे आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ (वय ४९, रा. पुणे) यांना खासगी व्यक्ती अमोल आप्पासाहेब पाटील (५०, रा. सोलापूर) याच्या माध्यमातून ट्रेलर चालकाकडून अडीच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्ट येथे जालनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.