
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; सोन्याचे दागिने काढून घराबाहेरही हाकलले
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याचे समोर आले आहे. ‘नांदायचे असेल तर माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये’, असा तगादा लावत विवाहितेला मारहाण करुन तिला घरातून हाकलून लावले. ही घटना १९ एप्रिल २०२४ ते २८ जून २०२४ दरम्यान जोगेश्वरी (ता. गंगापूर) येथे घडली.
पती पवन बाबासाहेब काळे, सासरा बाबासाहेब काळे, सासू मंगलबाई काळे (सर्व रा. जोगेश्वरी), नणंद प्रियंका समाधान खरात आणि नंदोई समाधान खरात (दोघे रा. गव्हाण ता. भोकरदन जि. जालना) अशी विवाहितेचा छळ करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात २१ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, विवाहानंतर पीडितेचा संसार जोगेश्वरी गावात सुरु होता. मात्र, १९ एप्रिल ते २८ जून २०२४ या काळात तिच्या पतीसह सासरच्या नातेवाईकांनी संगनमत करून तिला सतत मानसिक छळ देण्यास सुरुवात केली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…
दरम्यान, पीडितेला ‘तुला इथे नांदायचे असेल तर तुझ्या वडिलांकडून पाच लाख रुपये आण’, असा तगादा लावला. पैसे न दिल्यास तुला घरातून हाकलून देऊ आणि पवनचा दुसरा विवाह करू, अशी धमकीही देण्यात आली. पीडितेने ही बाब आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी महिलेसह पोलिस ठाण्यात जात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वीही घडली होती घटना
काही महिन्यांपूर्वीच अशी एक घटना समोर आली होती. यात व्यवसायासाठी ‘माहेरहून 3 लाख रुपये घेऊन ये, तसेच तुला घरकाम येत नाही, फारकत दे आणि मोकळी हो. नाहीतर तुझा आणि तुझ्या मुलींचा काटा काढेन’, ही धमकी देत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात सासरकडील मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.