
Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मंगरूळ-नवलाख उंब्रे रस्त्यावरील शेटेवस्ती परिसरात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत नाथा गोविंद पोटवडे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या काही दिवस आधीच, म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी अशाच एका डंपरच्या धडकेत नानीबाई सोपान नखाते (वय ७५) या वृद्ध महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अवघ्या एका आठवड्यात दोन वृद्धांचे बळी गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. अपघात घडल्यानंतर पोलीस केवळ पंचनामे करतात, मात्र या अवजड वाहनांच्या जीवघेण्या वेगावर आणि वाहतुकीवर ठोस नियंत्रण का आणले जात नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
आंबी, मंगरूळ-नवलाख उंब्रे, आंबळे, शिरे-शेटेवाडी आणि कदमवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात स्टोन क्रशर आणि रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमधून खडी व बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या शेकडो अवजड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असते. या वाहनांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला असून धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि प्रदूषणाचा प्रश्नही बिकट झाला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शांतराम कदम, देवा गायकवाड, निवृत्ती शेटे, नामदेव भसे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. परिसरातील २३ स्टोन क्रशर आणि ६ आरएमसी प्लांट कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनाची आक्रमकता आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळावरूनच स्वतःच्या मोबाईलद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी थेट संपर्क साधला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. त्यांनी आंबी, मंगरूळ-नवलाख उंब्रे, आंबळे, शिरे-शेटेवाडी व परिसरातील २३ स्टोन क्रशर तसेच ६ आरएमसी प्लांट बंद ठेवण्याबाबत संबंधित मालकांना सूचना दिल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत अधिकृत लेखी आदेश काढले जातील आणि ग्रामस्थांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिले.
दरम्यान, या घटनेनंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले की, अपघातास कारणीभूत ठरलेल्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे या मार्गावरील बेकायदा अवजड वाहतुकीवर सातत्याने कठोर कारवाई केली जाईल.