
Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठच्या ब्रह्मपुरी परिसरात गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल आज, ३० सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयात सुनावला जाणार आहे. मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला दोषी आहेत की नाही, याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. दोघे दोषी आढळल्यास त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर स्वतंत्र सुनावणी होणार आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद १७ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. अभियोजन पक्षाने न्यायालयासमोर परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासादरम्यान समोर आलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींविरोधात युक्तिवाद केला. तसेच दोन्ही आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी करण्यात आली आहे. अभियोजन पक्षातर्फे या खटल्यात एकूण २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये सौरभ राजपूत यांचे भाऊ बबलू, त्यांची आई आणि सौरभ यांचा मित्र यांचा समावेश आहे. याशिवाय ड्रम, औषधे, चाकू, सिमेंट आणि वाळू खरेदी करणाऱ्या दुकानांच्या मालकांचीही साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. हत्येनंतर आरोपी ज्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते, त्या ठिकाणांशी संबंधित पुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, खटल्यातील २२ साक्षीदारांनी आरोपी मुस्कान आणि साहिल यांच्याविरोधात जबाब दिले आहेत. तपासादरम्यान चाकू, उस्तरा, सिमेंट, वाळू आणि मोठा निळा ड्रम यांची खरेदी केल्याचे पुरावे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाच्या साक्षीतून घटनास्थळावरील परिस्थितीचे चित्र न्यायालयासमोर मांडण्यात आले. घटनास्थळी खोलीत रक्ताचे डाग आढळल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. तसेच मृतदेहाचे तुकडे करून ते सिमेंटने भरलेल्या निळ्या ड्रममध्ये लपविण्यात आल्याचा आरोप आहे. पोस्टमॉर्टम अहवालात धारदार हत्यारांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा अभियोजन पक्षाने केला आहे.
हेही वाचा : Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत लंडनहून मेरठला परतले. ते इंदिरानगर येथील आपल्या घरी पोहोचले. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पत्नी मुस्कान रस्तोगीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. २८ फेब्रुवारी रोजी त्यांची मुलगी पीहू हिचा वाढदिवस साजरा झाला.
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, ३ मार्च २०२५ रोजी सौरभ यांना झोपेचे औषध देण्यात आले. त्यानंतर मुस्कानने तिचा कथित प्रियकर साहिल शुक्ला याला घरी बोलावले. त्याच ठिकाणी सौरभ यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि ते सिमेंट भरलेल्या मोठ्या निळ्या ड्रममध्ये ठेवून लपविण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.
४ मार्च रोजी मुस्कानने तिच्या मुलीला माहेरी सोडले आणि साहिलसोबत शिमल्याला गेल्याचा आरोप आहे. याच काळात सौरभ यांच्या फोनवरून कुटुंबीयांना संदेश पाठवून त्यांना संभ्रमात ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे सौरभ बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येण्यास काही काळ लागल्याचे प्रकरणातील माहितीत नमूद आहे.
शिमल्याहून परतल्यानंतर १७ मार्च २०२५ रोजी या हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर घरातील निळ्या ड्रममधून सौरभ राजपूत यांच्या मृतदेहाचे तुकडे जप्त केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मुस्कान आणि साहिल यांना अटक केली. या प्रकरणाची सुनावणी सुमारे १३ महिने चालली. या कालावधीत न्यायालयात एकूण १२६ सुनावणीच्या तारखा झाल्या, तर २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. आता अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी मेरठ जिल्हा न्यायालय या प्रकरणात आरोपी दोषी आहेत की नाही, याचा निर्णय देणार आहे. दोष सिद्ध झाल्यास त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर पुढील सुनावणी होईल.