प्रेमाचं रक्तरंजित शेवट! प्रियकराचा प्रेयसीच्या घरात घुसून चाकूने हल्ला (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वेदांत सोलंकी आणि पीडित तरुणी विधी लखावत हे गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. याच वादाचा राग मनात धरून वेदांत हा विधीच्या घरी पोहोचला. तिथे चर्चेदरम्यान पुन्हा वाद झाला आणि वेदांतने स्वतःजवळ असलेला चाकू काढून विधीचा भाऊ आणि तिच्या आईवर सपासप वार केले.
हल्ला होताच विधीचा भाऊ तिला वाचवण्यासाठी मध्ये आला, मात्र आरोपीने त्याच्यावर अत्यंत निर्घृणपणे चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विधीची आई देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रक्ताने माखलेला आरोपी हातात चाकू घेऊन उभा होता आणि कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. बराच वेळ हा थरार सुरू होता. अखेर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पोलिसांनी युक्तीने त्याला जेरबंद केले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
तपासात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. या हत्येच्या केवळ २४ तास आधी विधीने वेदांतच्या त्रासाला कंटाळून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांनाही बोलावून समजूत काढली होती. त्यावेळी वेदांतने “मी यापुढे विधीला कोणताही त्रास देणार नाही” असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या एका दिवसात त्याने या भीषण कृत्याला अंजाम दिला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी शुद्धीवर आल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या घटनेने इंदूर शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.






