
जुन्या भांडणाच्या रागातून युवकाचा खून
कराड : नांदलापूर (ता.कराड) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी युवकावर तलवार व कोयत्याने वार करत खून केला. शनिवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण बोडरे (रा.जखिणवाडी, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जखिणवाडी येथील युवकांमध्ये मागील गेल्या सहा महिन्यांपूर्वी गावच्या यात्रेत भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून शनिवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नांदलापूर गावच्या हद्दीत टोळक्याने संगनमत करून प्रवीण बोडरेवर तलवार व कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करण्यात आले. या हल्ल्यात प्रवीण गंभीर जखमी झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने जखिणवाडी, नांदलापूर व मलकापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांना खुनात वापरलेली तलवार व कोयता जप्त केला आहे. युवकाचा मृतदेह रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला असून, रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली नसल्याने या घटनेची अधिक माहिती समजू शकली नाही.