
पुणे हादरलं! महिलेला लिफ्ट दिली; दुचाकीवर बसवून झाडीत नेले अन्...
पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता भिगवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिगवण परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या महिलेला दुचाकीवर बसवून तिला झाडीत नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीचे रेखाचित्र तयार करून त्याद्वारे आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व अधिकारी व पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. जाक्या कोंडक्या चव्हाण (वय ३०, रा. लिंगाळी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चव्हाण यांच्यावर यापूर्वी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली होती.
पीडित महिला भिगवण येथील हायवे लगत पुण्याकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. तेव्हा आरोपी तिथे आला. त्याने तिला “लिफ्ट देतो” असा बहाणा करत आपल्या दुचाकीवर बसवले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने माळद गाव परिसरातील रेल्वे पुलाजवळ गाडी थांबवून झाडीत अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासातून पोलिसांनी जाक्या चव्हाण याला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.