
Nashik Crime News : पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा, महिलेची अर्धनग्न अवस्थेत पूजा; भोंदूबाबाने उकळले साडेसात लाख!
नाशिक : आजारपण दूर करण्यापासून ते घरात पैशाचा पाऊस पाडण्यापर्यंत अनेक आश्वासने देत एका भोंदूबाबाने महिलेची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकरणात पूजाविधीच्या नावाखाली महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या विधींसाठी मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडेही मागवण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारात महिलेचे साडेसात लाख रुपये गेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील पीडित महिला पनवेल येथील रहिवासी असून तिला अस्थमाचा त्रास होता. नाशिकच्या गंगापूर परिसरात राहणाऱ्या अरुण धोंडू पाटील याच्याकडे दैवी शक्ती असल्याची माहिती तिला मिळाली होती. आजार बरा होईल, या आशेने महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित भोंदूबाबाने महिलेला नाशिकला आणण्यासाठी गाडी पाठवली. महिला आणि तिच्या पतीच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकला आणण्यात आले. येथे पूजा केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने त्यांना पनवेलला सोडण्यात आले. दुसऱ्यांदा केलेल्या विधीनंतरही आजारात सुधारणा झाल्याचा भास निर्माण झाल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.
महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर भोंदूबाबाने पुढे पैशाचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगितले. त्यानुसार महिलेला पुन्हा पनवेलहून नाशिकच्या गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ आणण्यात आले. येथे करण्यात आलेल्या कथित अघोरी विधीदरम्यान महिलेचे कपडे काढून तिला पांढरे, पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आले. तिच्या अंगावर पाणी टाकण्यात आले. तसेच मासिक पाळीतील रक्ताने माखलेल्या कपड्यांची पूजा करण्यात आली. या विधीसाठी मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का यांसारख्या वस्तू वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
या पूजेसाठी महिलेने पाच लाख रुपये दिले होते. भोंदूबाबाने साधारण दोन तास मंत्रोच्चार करत विधी केल्याचे सांगितले जाते. यावेळी बोकडाचा बळी देण्यात आल्याचाही आरोप आहे. विधी पूर्ण झाल्यानंतर घरी गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल, असे सांगून महिला आणि तिच्या पतीला पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून पनवेलला सोडण्यात आले. अशा तीन विधींच्या नावाखाली महिलेचे एकूण साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, अपेक्षित परिणाम न दिसल्याने महिलेची निराशा झाली. तिचा आजारही दूर झाला नाही आणि पैशाचा पाऊसही पडला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, भोंदूबाबाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या फसवणुकीची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दैवी शक्ती, मंत्र-तंत्र किंवा अघोरी पूजेद्वारे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून इतरांचीही फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकाराला बळी पडलेल्या नागरिकांनी पुढे येऊन गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
Ans: आजार बरा करण्याचे आणि पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Ans: मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे मागवण्यात आले. तसेच पूजेदरम्यान मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू आणि इतर वस्तू वापरल्याचा आरोप आहे.
Ans: अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.