
Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार...
नाशिक : शहरातून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी २३ टिपलाइन आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि संबंधित मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या अलर्टच्या आधारे नाशिक सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची छाननी करून ही कारवाई केली. अशा प्रकारच्या सामग्रीच्या प्रसारावर कारवाई करण्यासाठी सायबर यंत्रणा देशभर सक्रिय आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत संशयितांकडून सोशल मीडियावर अशा व्हिडिओंचा प्रसार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सायबर टिपलाइन तसेच नाशिक शहरातून संबंधित आयपी अॅड्रेसची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यातून सुमारे २५० व्हिडिओ अपलोड किंवा प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर २३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या डिजिटल हालचालींचा तपास केला जात आहे.
हेही वाचा: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
हा प्रकार केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित आहे की त्यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संशयितांकडून सोशल मीडियावरील बनावट प्रोफाइलचा वापर करण्यात आला होता का, तसेच या माध्यमातून अल्पवयीन मुलांना किंवा त्यांच्या पालकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास केला जात आहे. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील अन्य संबंधितांचा शोध घेतला जात आहे.
अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कोणतीही सामग्री फॉरवर्ड, डाउनलोड किंवा साठवून ठेवणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची सामग्री आढळल्यास ती संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करून राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर माहिती देता येते. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार सायबर गुन्ह्यांसाठी १९३० ही हेल्पलाइन उपलब्ध आहे.
Ans: