सोजन्य फोटो - AI Gemini
नाशिक : शहरातील वर्दळीच्या दत्त मंदिर सिग्नल परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव कार चालवणाऱ्या २२ वर्षीय चालकाने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली. यापूर्वी आरोपीने एका महिला दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी पाठलाग करून आरोपी वैभव दांडे याला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सिग्नल तोडून भरधाव वेगाने कार पळवली
मिळालेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर चौकात वाहतूक पोलीस नियमितपणे वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्याचवेळी आरोपी वैभव दांडे याने भरधाव कार चालवत सिग्नल तोडला. पुढे जात असताना त्याने एका महिला दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर तेथे तैनात असलेल्या पोलिस हवालदाराने आरोपीला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, कार थांबविण्याऐवजी चालकाने वेग आणखी वाढवला.
पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न
आरोपीने कार थेट हवालदाराच्या दिशेने नेल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. कार अंगावर येत असल्याचे लक्षात येताच हवालदाराने प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आरोपीने कार न थांबवता पुढे नेली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तेथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. पोलिसावर कार घालण्याचा प्रयत्न झाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
हेही वाचा:Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड
पोलिसांचा पाठलाग; चालक ताब्यात
हवालदाराला चुकवून आरोपीने घटनास्थळावरून कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही नागरिकांनीही पोलिसांना मदत केली. अखेर पोलिसांनी आरोपीला कारसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. या घटनेमुळे दत्त मंदिर सिग्नल परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न यांसह विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, महिला दुचाकीस्वाराला झालेल्या धडकेबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच व्हिडीओ आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनेचा क्रम तपासला जात आहे.






