
Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासार गल्लीत राहणारे पुष्कराज पांडुरंग केवारे (वय ५८) हे आपल्या कुटुंबीयांसह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे आणि इतर साहित्याची उचकापाचक करून मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. चोरांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली. एवढ्यावरच न थांबता घरातील दुचाकी (क्रमांक एमएच १५ एलडी ५०३०) आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरदेखील सोबत नेला.
१४ नोव्हेंबर रोजी रात्री केवारे कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतल्यानंतर घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडल्याचे आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात मोठी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ येवला पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, तपासासाठी हस्तरेषा पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये दोन तोळे वजनाचा लक्ष्मीहार, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, पाच तोळे वजनाचे ११ जोड सोन्याचे टॉप्स, दहा तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या यासह सुमारे २३ तोळे सोने, चार लाख रुपयांची रोख रक्कम, दुचाकी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण १२ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
या प्रकरणी पुष्कराज केवारे यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे कासार गल्ली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. अज्ञात चोरांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल लवकरात लवकर हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आता येवला शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
Ans: नाशिक जिल्ह्यातील येवला शहराच्या मध्यवर्ती भागातील कासार गल्लीत ही घरफोडीची घटना घडली आहे
Ans: चोरांनी २३ तोळे सोन्याचे दागिने, ४ लाख रुपयांची रोकड, दुचाकी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण १२ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
Ans: येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१ (४) आणि ३०५ प्रमाणे अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.