सावन वैश्य / नवी मुंबई : नवी मुंबईतील विविध व्यावसायिकांना सोशल मीडिया एक्स (ट्विटर) च्या माध्यमातून धमक्या देण्याचे, बदनामी करण्याचे आणि खोट्या माहितीच्या आधारे मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, “नवी मुंबई पोलीस असे प्रकार थांबवण्यासाठी नेमकी का कारवाई करत नाहीत?” असा सवाल व्यावसायिक व स्थानिक नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही फेक ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून नवी मुंबईतील व्यावसायिक, व्यावसायिक संघटना, तसेच काही पोलीस अधिकारी यांच्याविरोधात पोस्ट्स केल्या जात आहेत. या पोस्ट्समध्ये संबंधितांची छायाचित्रे संबंधित वरिष्ठ नेते, अधिकारी यांना टॅग करून त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप लावले जात आहेत. काही प्रकरणांत तर या पोस्ट्सद्वारे धमक्यांचे स्वरूपही आढळून येत आहे. व्यावसायिक संघटनांकडून सांगण्यात आले की, काही लोक सोशल मीडियावर विविध नावाखाली फेक अकाउंट तयार करून, विशिष्ट व्यक्तींविरुद्ध मोहिम राबवत आहेत. “हे अकाउंट्स काही वेळा सुपारीवर चालतात”, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही व्यवसायिकांनी तर या ट्विटर पोस्ट्सनंतर त्यांच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण झाल्याची तक्रार केली आहे.
या संदर्भात काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही कायदेशीररीत्या व्यवसाय करत असताना देखील काही फेक अकाउंट्स आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत. या माध्यमातून आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढंच नाही, तर त्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो पोस्ट करून त्यांनाही लक्ष्य केलं जात आहे.”
सायबर कायद्यातील तज्ञांचे मत आहे की,“फेक अकाउंटद्वारे धमक्या देणे, खोट्या पोस्ट्स शेअर करणे किंवा कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे हे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि भारतीय दंड संहिता कलम 500, 506 अंतर्गत दंडनीय अपराध आहे. पोलिसांनी स्वतःहून या बाबींची नोंद घेऊन चौकशी सुरू करायला हवी.”
अनेकांना प्रश्न पडतो आहे की, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविरोधात नवी मुंबई पोलीस प्रशासन इतके शांत का आहे? सायबर कायद्यांनुसार, कोणत्याही व्यक्तीचा छळ, बदनामी, किंवा धमकी देण्यासाठी सोशल मीडिया वापरणे हा गुन्हा ठरतो. अशा प्रकारांवर सायबर पोलिसांकडून तपास आणि कारवाई होणे आवश्यक आहे. कारण यामध्ये अनेक वेळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत खात्याची बदनामी देखील केली जाते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून अशा प्रकारच्या तक्रारींवर कारवाई होणार का, याबाबत स्थानिक व्यावसायिक आतुरतेने वाट पाहत आहेत.