संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात खुलेआम सुरू असलेली गुटखा विक्री स्थानिक पोलिस अन् गुन्हे शाखेला दिसली नाही. पण, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लेखी आदेश काढल्यानंतर गुटखा कारवाईला जोर वाढला आहे. त्यातही प्रमुख एजंट सोडून छोट्या गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील दोन ठिकाणी तंबाखुजन्य १६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. आयुक्तांनी थेट नागरिकांनाच पोलिस नियत्रंण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन देखील केले आहे.
वडगाव शेरी येथे केलेल्या पहिल्या कारवाईत पोलिसांनी श्रवण हनुमाराम गेहलोत (वय ३५, रा. वडगांव शेरी), लाबुराम पकाराम देवासी (वय २५) व दिनेशकुमार आचलाराम प्रजापती (वय २७) यांना पकडले आहे. त्यांच्याकडून ६ लाख ४५ हजारांचा माल ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
येरवड्यातील दुसऱ्या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुभाषचंद्र रामअवध मोर्या (वय ३४, रा. येरवडा, मुळ. उत्तरप्रदेश) याला पकडले आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १० लाख ११ हजार २४० रुपयांचा प्रतिबंध गुटखा व पान मसाला जप्त केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
दोन किलो गांजा जप्त
चंदननगर परिसरात कारवाई करून पोलिसांनी दोन किलो १०० ग्रॅम गांजा पकडला आहे. याप्रकरणी विकी विजय काशीद (वय २२, रा. वाघोली) याला अटक केली आहे. वडगाव शेरी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
राज्यात गुटखा बंदी असताना शहरात खुलेआम पानपट्टी, किराणा माल दुकानात गुटखा विक्री होत आहे. पोलिस आयुक्तांना याच्या सातत्याने तक्रारी येऊ लागल्यानंतर त्यांनी थेट नागरिकांनाच पोलिस नियत्रंण कक्षाला यासंदंर्भाची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिस नियंत्रण कक्ष (डायल ११२ किंवा १००) या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.