सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात दाखल मोक्काच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, या गुन्ह्यात निलेश घायवळचा भाऊ तसेच पिस्तूल प्रकरणात चर्चेत आलेला सचिन घायवळ यालाही आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
कोथरूड भागात कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीकडून एका तरुणावर शुल्लक कारणावरून गोळीबार तसेच दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले होते. या गुन्ह्यात निलेश घायवळचा समावेश समोर आल्यानंतर त्यालाही या गुन्ह्यात आरोपी केले होते. याच गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. गुन्ह्याचा तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्याकडून सुरू होता.
दरम्यान, निलेश घायवळ परदेशात गेल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. न्यायालयाने पासपोर्ट हजर करण्याचे आदेश दिलेले असताना तो परदेशात कसा गेला, असा प्रश्न उपस्थित झाला. तपासात त्याने नावात बदल करून हा पासपोर्ट काढल्याचे समोर आले. त्या प्रकरणात आता स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, गोळीबारप्रकरणाचा गुन्हा कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला देखील आरोपी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
निलेश घायवळवर ३० दिवसांच्या आत ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूडमध्ये झालेला गोळीबार, वाहनांचा खोटा नंबर, घरात मिळून आलेलं शस्त्र, पासपोर्ट बनावट प्रकरण, खंडणीसारखे गंभीर गुन्हे घायवळवर दाखल करण्यात आले आहेत.
निलेश घायवळची गुन्हेगारीची वाटचाल
कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ सध्या चर्चेत आहे. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याबद्दल राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. तर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला गुंड निलेश घायवळ लंडनला पसार झाल्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यातील राहणारा निलेश घायवळ शिक्षणासाठी पुण्यात आला. इथे त्याची ओळख गुंड गजा मारणेबरोबर झाली. दोघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाचा खून केला. या गुन्ह्यात दोघांना सात वर्षांची शिक्षा झाली. बाहेर आल्यानंतर त्यांची गुन्हेगारीची वाटचाल सुरू झाली. गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात दोन गणपती मंडळाच्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यातील वितुष्ट वाढत गेले. वीस वर्षांपासून या दोघांमध्ये शत्रुत्व आहे. या काळात त्यांनी एकमेकांवर अनेकदा लक्ष्य केले.