कांदा व्यापाऱ्याने केली महिलेची फसवणूक; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर 30 लाखांना गंडा घातला
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या महिला व्यापाऱ्याची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने वैजापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत व्यापाऱ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत महिलेने तक्रारीनुसार, तृप्ती दीपक वावरे (वय ४३, रा. विद्यानगर, वैजापूर) या २०२३ पासून वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत परवान्याअंतर्गत कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांचा व्यवसाय वैजापूरसह नाशिक जिल्हा येथील अंदरसुल परिसरातही सुरू आहे. व्यवसायात त्यांचा मुलगा प्रितेश वावरे मदत करतो तसेच त्यांच्या नावावर वे ब्रिजही चालवला जातो. मात्र, आरोपीने काही रक्कम रोख व यूपीआयद्वारे दिली असली तरी ३० लाख ४१ हजार १७४ रुपये थकवून संपर्क तोडल्याचा आरोप आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, वारंवार फोन करूनही आरोपी टाळाटाळ करत राहिला आणि नंतर त्याचे मोबाईल क्रमांक बंद झाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २५ ऑगस्ट २०२५ रोजी मोहम्मद फजल पाशा (बाबा ट्रेडिंग कंपनी, रा. २०८ संथेपेटे रोड, चन्नविरप्पा फूट मंडी, मिंजा मोहल्ला, हसन) हा व्यापारी त्यांच्या कांदा खरेदी केंद्रावर आला. सुरुवातीला त्याने नियमितपणे माल खरेदी करून ऑनलाइन व रोख रक्कमेद्वारे पैसे देत विश्वास संपादन केला. यानंतर २५ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आरोपीने विविध ट्रकद्वारे एकूण १२३३९ क्विंटल कांदा खरेदी करून नेला. या मालाची एकूण किंमत १ कोटी ६४ लाख ४९ हजार ५०९ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
ट्रकांना डिझेल भरताना आरोपीने स्थानिक राधालक्ष्मी एचपी पेट्रोल पंपाचे मालक परेश भोपळे यांचाही विश्वास संपादन करून त्यांच्याकडे २ लाख रुपये थकवले. अशा प्रकारे महिला व्यापारी व पेट्रोल पंप चालक मिळून एकूण ३२ लाख ४१ हजार १७४ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेऊन थकीत रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी पीडितेने पोलिसांकडे केली असून वैजापूर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






