
'अडीच लाख द्या, नाहीतर गुन्हा'; महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा
नागपूर : झोपेचे औषध देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून औषध व्यावसायिक आणि तरुणीने एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप केल्याचा प्रकार मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप औषध व्यावसायिकाने केला आहे.
दुसरीकडे, आपण दिलेले अडीच लाख रुपये परत मागितल्यावर व्यावसायिकाने पैशांच्या बदल्यात हॉटेलमध्ये वेळ घालवण्याची किंवा दुसऱ्या महिलेची व्यवस्था करण्याची मागणी केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. परस्परविरोधी तक्रारींवरून मानकापूर पोलिसांनी दोघांविरुद्धही स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. औषध व्यावसायिक आकाश (वय ३७, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे मानकापूर परिसरात औषध विक्रीचे दुकान आहे. ते गोधनी येथील व्यायामकेंद्रात नियमित जात असताना त्यांची शबनम खान (वय २६, रा. सिव्हिल लाइन्स, सीताबर्डी) हिच्याशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली.
निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
वर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी शबनमने त्यांच्याकडे झोपेच्या गोळ्यांची मागणी केली. मात्र, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी औषध देण्यास नकार दिला. त्यानंतर शबनमने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. वर्मा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तिने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.
तरुणीचीही व्यावसायिकाविरुद्ध तक्रार
शबनम खान हिनेही आकाश वर्मा यांच्याविरुद्ध मानकापूर पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार, तिने वर्मा यांना अडीच लाख रुपये दिले होते. ही रक्कम परत मागितल्यानंतर वर्मा यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. त्याऐवजी पैशांच्या बदल्यात हॉटेलमध्ये वेळ घालविण्याची अट घातल्याचा आरोप शबनमने केला. ही मागणी तिने नाकारल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मानकापूर पोलिसांनी आकाश वर्मा यांच्याविरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमांनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीला फोन करून धमकावले
17 ऑगस्टला शबनमने वर्मा यांच्या पत्नीला फोन करून पतीला बलात्कार आणि विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच मेडिकल दुकान बंद पाडण्यासह भावाकडून वर्मा यांचे हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल तर अडीच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे वर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पत्नीने हा प्रकार वर्मा यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.