फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पिंपरी-चिंचवड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याच्या कारणातून गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा पहाटेच्या सुमारास हिंसक शेवट झाल्याची घटना पिंपरीतील बौद्धनगर झोपडपट्टी परिसरात घडली. मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास तिघांनी तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यासह शरीरावर वार करण्यात आल्याने तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणासह दोन महिलांना अटक केली आहे. आकाश अनिल खंडागळे (वय ३२, रा. बौद्धनगर, पिंपरी) याच्यासह ५० आणि २८ वर्षीय दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या पत्नीला त्याच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार वाद होत होते. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे तरुण झोपेत असताना आरोपींनी त्याला गाठले. त्याच्याशी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी हातोडीने तरुणाच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर आणि बरगड्यांवर वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी तरुणाच्या ३० वर्षीय बहिणीने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आकाश खंडागळे याच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाची सूत्रे हाती घेत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हल्ल्यामागील नेमकी कारणे, आरोपींची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.






