घोडेगाव: इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करा २४ टक्के प्रमाणे वार्षिक परतावा देतो असे आमिष दाखवत कोटयावधी रूपयांची फसवणूक केलेल्या तिघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी गाडे यांनी तक्रार दिली आहे.सिध्देश मनोज काळे (रा. कोलदरे, ता. आंबेगाव), गणेश दत्तात्रय गव्हाणे (रा. साल, बाभुळवाडी, ता. आंबेगाव) व राहुल दिलीप काळे (रा. शिंदेवाडी, ता. आंबेगाव) या तीन जणांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सिध्देश काळे व गणेश गव्हाणे यांनी इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनी मार्फत शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करत होते. सन २०२२ च्या दरम्यान सिध्देश काळे व गणेश गव्हाणे यांनी शिवाजी गाडे यांची भेट घेवून आमच्या कंपनीमध्ये पैश्यांची गुंतवणूक करा तुंम्हाला २४ टक्के प्रमाणे वार्षिक परतावा देतो. घोडेगाव मधील अनेक लोकांनी यामध्ये गुंतवणूक केले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे गाडे यांनी सन २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान २६ लाख रूपयांची आर. टी. जी. एस व्दारे गुंतवणूक केली. परंतु त्यांना परतावा न भेटल्याने त्यांनी चौकशी केली असता सिध्दोश काळे मुंबईला गेले असल्याचे समजले. त्याची मुंबई येथे भेट घेतली त्याच्याकडे पैश्यांची मागणी केली असता तेथे सिध्देश काळे व राहुल काळे यांनी शिविगाळ व दमदाटी करत पैसे देण्यास नकार दिला.
दरम्यान संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या इतर सात लोकंाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून १ कोटी २ लाख ९२ हजार ३०१ रूपये व २६ लाख रूपये असे एकूण १ कोटी २८ लाख ९२ हजार ३०१ रूपये इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीमध्ये सिध्देश काळे व गणेश गव्हाणे यांनी गुंतवणूक करायला सांगून या पैशांवरील २४ टक्के प्रमाणे वार्षिक परतावा न देता अन् गुंतवणूक केलेले पैसे न देता आर्थिक फसवणूक केली असल्याचे शिवाजी गाडे यांनी तक्रारीमध्ये नमुद केले आहे.
सायबर चोरट्यांकडून तरुणांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम असून, सायबर चोरट्यांनी दोन घटनांत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. खराडी भागातील तरुणाची ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला एका ग्रुपमध्ये अॅड केले. तिथे गुंतवणूकीची माहिती दिली. तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला ३६ लाख ५५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. हडपसर भागातील तरुणाचीही अशाच प्रकारे ८ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वानवडी पोलिसांत तक्रार दिली.