गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात; पोलिसांना घरात सापडला ॲम्युनिशन बॉक्स
पुणे : कुख्यात गुंड गँगस्टर नीलेश घायवळच्या कोथरूडमधील घराच्या झडतीत घरातून काडतुसे तसेच पुंगळ्यासोबत काडतुसे ठेवण्याचे लाकडी खोके (ॲम्युनिशन बॉक्स) सापडले आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी थेट खडकी येथील दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील हे खोके घायवळपर्यंत कसे पोहोचले ? यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार प्रकरणात मोक्का कारवाई झाल्यानंतर घायवळपर्यंत याच्यावर आतापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत. घायवळ सध्या युरोपमध्ये आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संस्थेशी (इंटरपोल) संपर्क साधला गेला आहे. घायवळला पकडण्यासाठी ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीसही बजाविण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या कोथरूडमधील श्री संत ज्ञानेश्वर कॉलनीतील घरी पोलिसांनी झडती घेतली. तेव्हा तेथून दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. त्याच्या घरात काडतुसे ठेवण्याचे खोके सापडले. हे खोके खडकीतील दारूगोळा कारखान्यातील असल्याचा संशय आहे. हे खोके रिकामे आहे. मात्र, हे खोके घायवळपर्यंत पोहोचले कसे, यादृष्टीने तपास सुरू असून, याबाबत दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे,
काडतुसे ठेवण्याच्या खोक्यावर २०१७ वर्ष असा उल्लेख आहे. खोक्यावर ५.५६ एमएम असे लिहिले आहे. पोलिसांनी खोक्याची तपासणी केली. तेव्हा खोक्यात सत्तुर सापडला आहे. त्यात काडतुसे नव्हती. या खोक्यात एकावेळी ३०० काडतुसे बसतात, असी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील खोके घायवळच्या घरी आले कसे असा प्रश्न आहे.