मंदिरातील दानपेटी फोडून राेकड चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून सापळा रचून पकडले
पुणे : स्वारगेटसारख्या परिसरातील एका प्रसिद्ध अशा एका मंदिरातील दानपेटी फोडून ३८ हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. चोरट्याकडून ३८ हजार रुपये तसेच कटावणी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. मुकुंदनगर परिसरातील हे मंदिर जुने असल्याचे सांगण्यात आले.
महादेव तुकाराम गिरमकर (वय ४२, रा. कवठा, विकासवाडी, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, शैलेश आलाटे, शंकर संपते, सागर केकाण, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात घरफोड्यांसोबतचं दुकाने आणि मंदिरातून पैसे व दागिने चोरीला जात आहेत. सततच्या घटनांमुळे पोलिसांना या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरातील एका मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटीतील ३८ हजारांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली होती. स्वारगेट पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला जात होता.
दरम्यान, पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यात संशयित चोरटा दिसून आला होता. त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. चित्रीकरणातील चोरट्याचा वावर स्वारगेट एसटी स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गिरमकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याची कबुली दिली. त्याने आणखी कुठे चोरी केली आहे का याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.