साताऱ्यात पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून घेतले ताब्यात
सातारा : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवार पेठ मोरे कॉलनी येथे शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई केली आहे. पिस्तुलासह संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय सुतार (वय २६, रा. मोरे कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक जिवंत काडतूस, रोख रक्कम असा ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिनांक २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन मेत्रे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने तपास सुरू होता. मंगळवार पेठ सातारा येथील गुन्ह्यातील घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतली. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मोरे कॉलनीत कारवाई करत सुतारला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
सुतार याच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीचे पिस्टल, ५०० रुपये किंमतीचे जिवंत काडतूस व १२ हजार रुपये रोख असा ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलिस आमदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.