गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना बेड्या; तब्बल 17 लाखांचा गांजा जप्त
पुणे : राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा विक्रीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मुंढवा परिसरात छापा कारवाई करून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. प्रमोद सुधाकर कांबळे (वय ४४, रा. करमाळा, जि. सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय ४१, रा. मोहननगर,आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी कांबळे आणि पारखे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सापाळा लावून कांबळे आणि पारखे यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात अलाी. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गांजा, मेफड्रोन विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.
84 लाखांचे अमली पदार्थ जप्त
गेल्या काही दिवसाखाली पुणे शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधील ही मोठी कारवाई मानली जात आहे.