चांदी देण्याच्या अमिषाने महिलांची फसवणूक; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
इचलकरंजी : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बाजारभावापेक्षा कमी दराने बिलासहीत सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या सुभाष संकपाळ, साक्षी सुभाष संकपाळ (दोघी रा. नांदणी रोड यड्राव) व विकी आगवाणी (रा. आसरानगर हनुमान मंदिर चौक) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. यापैकी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रेश्मा चाँदसाहेब जमादार यांनी फिर्याद दिली आहे.
विद्या व साक्षी संकपाळ आणि विकी आगवाणी यांनी संगनमत करत फसवणूकीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी दरात सोने-चांदी बिलासहित देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रेश्मा जमादार यांच्याकडून २ लाख रुपये, त्यांच्या मैत्रिणी शितल विठोबा वाघमारे यांच्याकडून ३० हजार रुपये व सलीमाबी जावेद नदाफ यांच्याकडून ३ लाख ८५ हजार रुपये असे ६ लाख १५ हजार रुपये घेतले. १६ नोव्हेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत तिघांनी या रकमा घेतल्या. त्यानंतर वारंवार मागणी करुनही सोने-चांदी अथवा पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक केल्याप्रकरणी रेश्मा जमादार यांनी शिवाजीनगर पोलिसांत तिघांविरुध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना अटक केली आहे.