संग्रहित फोटो
टेंभुर्णी : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माढा तालुक्यात खळबळ उडालेल्या अरण (ता. माढा) येथील कार्तिक बळीराम खंडाळे (वय १०) खुन प्रकरणाचा तपास लावण्यास टेंभूर्णी पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी मयताचा सख्खा चुलत भाऊ असलेला संदेश सहदेव खंडाळे (वय १९, रा. अरण) याला अटक केल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
अरण (ता. माढा) येथील कार्तीक बळीराम खंडाळे (वय १०) या शाळकरी मुलांचे मंगळवारी (दि. १५) अपहरण झाले होते. शनिवारी (दि. १९) त्याचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत तुळशी मोडनिंब रोडवर असलेल्या सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या कोरड्या कालव्यात आढळून आला. या घटनेनंतर अरण परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्याचा खून का व कोणी केला याचा तपास करण्याचे आव्हान टेंभुर्णी पोलीसांसमोर होते. पोलिस निरिक्षण नारायण पवार यांनी तपास करताना तांत्रिक विश्लेषणावरून कार्तिकचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरकुलावरून भावा भावातील वादातून खून केल्याची कबुली दिली. त्याला माढा न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, साहेब, करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, संजय जगताप, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक खुणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीश जोग, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलिस उपनिरिक्षक पुरुषोत्तम धापटे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांनी ही कारवाई केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे शोध
या गुन्ह्याचा शोध घेताना पोलिसांनी अरण मोडनिंब परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात मंगळवारी (दि १५) पाच वाजता कार्तिक संशयित आरोपी संदेश खंडाळे याच्या गाडीवर बसून गेल्याचे व मोडनिंब करकंब रोडवर वेताळसाहेब कट्ट्याककडे ६. ५० वाजता जाताना दिसून आले. घटना स्थळाजवळील मोबाईल लोकेशन, सीडीआरसह पुराव्याच्या तांत्रिक विश्लेषणावरून संशयित आरोपीपर्यंत पोहोचल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
आरोपी तपास कामात पोलीसांबरोबरच
मयत कार्तिक हा बेपत्ता झाल्यापासून पोलिस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. वेगवेगळ्या बाबी तपासत असताना यातील संशयित आरोपी संदेश सहदेव खंडाळे पोलिसांसोबतच होता.