फोटो सौजन्य - Social Media
हॉटेलमध्ये राहणं हे आजकाल आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालं आहे. कधी प्रवासामुळे, तर कधी ऑफिसच्या कामानिमित्ताने आपण वेगवेगळ्या ठिकाणी थांबतो. पण तंत्रज्ञान जसं सोयीस्कर झालंय, तसंच त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होतो आहे. यामध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे हिडन कॅमेरे. हॉटेल रूममध्ये लपवून ठेवलेले हे छोटे कॅमेरे तुमच्या खासगी आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे स्वतःची सुरक्षा जपण्यासाठी काही सोपे उपाय माहिती असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, खोलीत गेल्यावर प्रकाश बंद करून आपल्या मोबाईलची फ्लॅशलाइट ऑन करा आणि खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ती फिरवा. विशेषतः आरसा, टीव्ही, एसी, स्मोक डिटेक्टर, घड्याळ किंवा सजावटीच्या वस्तूंवर नीट लक्ष द्या. कॅमेऱ्याच्या लेन्सवर फ्लॅशलाइट पडली तर ती हलकीशी चमकते किंवा लालसर बिंदू दिसतो. यामुळे लपवलेला कॅमेरा सहज ओळखता येतो. दुसरा उपाय म्हणजे मोबाईल कॉल टेस्ट. तुम्ही मोबाईलवर कुणाला तरी कॉल करून स्पीकर ऑन ठेवा. त्यानंतर खोलीत जिथे शंका आहे तिथे फोन फिरवा. जर तिथून ‘टिन-टिन’ किंवा क्रॅकिंगसारखा विचित्र आवाज आला, तर समजून घ्या की आसपास एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, जे कॅमेरा असू शकतं.
तिसरं म्हणजे, खोलीत पाऊल टाकल्यावर नीट निरीक्षण करा. स्मोक डिटेक्टर चुकीच्या ठिकाणी लावलेला आहे का? चार्जर, अडॅप्टर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू अनोख्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत का? काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं दिसत असेल, तर शंका घ्या. कारण बरेचदा हे कॅमेरे अशाच वस्तूंमध्ये लपवलेले असतात. चौथा उपाय म्हणजे Wi-Fi स्कॅनिंग. आजकाल अनेक हिडन कॅमेरे Wi-Fi नेटवर्कशी जोडलेले असतात. तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही Wi-Fi स्कॅनर अॅप डाउनलोड करू शकता. हे अॅप त्या नेटवर्कला जोडलेले सर्व डिव्हाइस दाखवते. त्यामध्ये एखादं अनोळखी किंवा संशयास्पद नाव दिसलं, तर तो कॅमेरा असण्याची शक्यता असते.
पाचवा महत्वाचा उपाय म्हणजे आरशाची चाचणी. हॉटेलमधल्या आरशावर तुमची बोट ठेवून नीट पाहा. जर बोट आणि त्याचं प्रतिबिंब यामध्ये अंतर असेल, तर तो साधा आरसा आहे. पण जर बोट आणि परावर्तित प्रतिमा अगदी चिकटून दिसली, तर तो आरसा दोन बाजूंनी पारदर्शक (स्पाय ग्लास) असू शकतो. याचा वापरही हिडन कॅमेऱ्यासाठी होतो. हे सर्व सोपे उपाय वापरून तुम्ही तुमची प्रायव्हसी वाचवू शकता. जर खोलीत काही संशयास्पद वाटलं, तर ताबडतोब हॉटेल मॅनेजमेंटला कळवा. गरज भासल्यास पोलिसांनाही माहिती द्या. कारण तुमची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये थांबणार असाल, तेव्हा या गोष्टींचं नक्की भान ठेवा आणि सावध राहा. सुरक्षितता ही आपल्या हातात आहे, हे लक्षात ठेवा.