ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या
वडूज : वडूज शहरातील श्री ज्योतिबा मंदिरातून पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची घटना रविवार, ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेमुळे वडूज शहरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ तीन दिवसांत आरोपीला जेरबंद करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. दीपक शहाजी माने (वय २८, रा. वडूज) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या आईकडे ठेवलेली चोरीची मूर्ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
तपासाचा धागा सीसीटीव्हीतून
३१ ऑगस्ट रोजी वडूज-कराड रस्त्यावरील श्री ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची फिर्याद पुजारी दिलीप कृष्णा गोडसे यांनी दिली होती. तपासादरम्यान मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसून आला. त्यावरून तो वडूज बसस्थानक परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सागर बदडे, वाहतूक शाखेतील अजय भोसले व गजानन वाघमारे यांनी संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली देत मूर्ती आईकडे ठेवली असल्याचे सांगितले.
आरोपीच्या आईकडून मूर्ती हस्तगत
यानंतर पोलिसांनी दीपकची आई जया माने हिचा शोध घेतला. वडूज-दहिवडी रोडवर त्या मिळाल्यानंतर चौकशीत जुन्या कपड्यांमध्ये गुंडाळलेली पितळेची मूर्ती त्यांच्या जवळ असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मूर्ती जप्त करून मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांची तत्पर कामगिरी
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने लावलेल्या छड्यामुळे आरोपी जेरबंद झाला आणि मंदिरातील चोरीचा उलगडा झाला. पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रणधीर कर्चे करीत आहेत.
राज्यस्थानातील दोघांना ठोकल्या बेड्या
पुणे रेल्वे स्टेशनच्या फलाटवर प्रवाशांकडील आणि शहरातील विविध भागात नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या राज्यस्थानातील दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. राज्यस्थानतून पुण्यात येऊन रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून त्याठिकाणी वास्तव्य करत रात्री तसेच दिवसा हे आरोपी मोबाईल चोरत असल्याचे समोर आले आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांनी या दोघांना पकडून तब्बल २० मोबाईल जप्त केले आहेत. बुद्धराज मोरपाल बागडी (वय ३२) अमरलाल हंसराज बागडी (वय २२, दोघेही, रा. मंगळवार पेठ. मुळ. राज्यस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी जयराम पायगुडे तसेच पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर व त्यांच्या पथकाने केली आहे.