एसटी बसमध्ये माथेफिरूकडून तरुणावर कोयत्याने वार; झडप घालून पोलिसांनी आरोपीला पकडले
बारामती : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, खून, मारामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना दररोज घडत आहेत. अशातच आता बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती- इंदापूर या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटीमध्ये माथेफिरुने एकावर कोयत्याने वार करून स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केला आहे, यानंतर एसटी बसमधून उतरून हातात कोयता घेऊन महामार्गावरून चालणाऱ्या या माथेफिरूला जीवाची बाजी लावून पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले आहे. ही घटना बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर घडली आहे.
बारामती- इंदापूर बसमध्ये कोयता घेऊन चढलेल्या या माथेफिरूने बसमधील एका युवकावर वार केले, यानंतर स्वतःवरही वार केले. या घटनेमुळे प्रवासी घाबरले. काही प्रवाशांनी तातडीने पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती डॉ. सुदर्शन राठोड यांनी सुत्रे हलवली. तातडीने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांना या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून आदेश दिल्याने वालचंदनगर पोलिसांनी तातडीने जाऊन वार करणाऱ्या तरुणाला सीताफिने पकडून बारामती पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान काटेवाडी या ठिकाणी बस थांबवण्यात आल्यानंतर, आरोपी कोयता घेऊन खाली उतरला असता पुलावरून निघाला. त्यावेळी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शैलेश स्वामी, अजित थोरात, परिमल मानेर, विजय मदने, सतीश फुलारे हे घटनास्थळी आले. त्यावेळी पोलीस हवालदार शैलेश स्वामी यांनी धाडस दाखवून आरोपीला बोलण्यामध्ये गुंतवले. त्याच्यावर अचानक झडप टाकली. त्यावेळी इतर सर्व पोलिसांनी पाठीमागून या आरोपीला जोरात मिठी मारल्याने आरोपीला जेरबंद करता आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हल्लेखोर व जखमीची ओळख अद्याप समजली नसून यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
आंबेगाव पठार परिसरात टोळक्याचा तरुणावर हल्ला
पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात सात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या वादातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिराजवळील चाळीच्या परिसरात घडला आहे. टोळक्याच्या या हल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. अभिजीत अवचरे (वय १८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार राजेंद्र दानवले (वय १९, रा. ओव्हाळ वाडा, कात्रज गाव) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पृथ्वीराज पवार (वय २०), संकेत विठ्ठल रेणुसे (वय २०) व नविन नरसप्पा गाडधरी (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.