ड्रग्जप्रकरणात निलंबित डॉक्टरसह तिघांना ठोकल्या बेड्या; तब्बल 'इतक्या' लाखांचा अंमली पदार्थ जप्त
पुणे : पुण्यात एका निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह तिघांना पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक, म्हणजे, तो एका नामांकित रुग्णालयात प्रॅक्टीस करत असतानाच त्याला यापुर्वीही ड्रग्ज प्रकरणातच पकडले होते. नतंर त्याला निलंबित केले होते. त्यानंतर आता त्याला दुसऱ्या वेळेस पकडण्यात आले आहे. तिघांकडून तब्बल ११ लाख ४३ हजार रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. बिबवेवाडीत ही कारवाई केली आहे.
मोहमद उर्फ आयान जारून शेख (वय २७, रा. उंड्री), सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) व अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७, रा. नारायण पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे तसेच उपनिरीक्षक दिंगबर कोकाटे, दयानंद तेलंगे व त्यांच्या पथकाने केली आहे.
मोहमंद उर्फ आयान शेख हा मुळचा जम्मू येथील आहे. त्याचे एमबीबीएसचे शिक्षण झालेले आहे. त्याने डॉक्टर म्हणून काही रुग्णालयात काम देखील केले होते. पुण्यातील मध्यभागात असलेल्या एका नामांकित रुग्णालयात तो प्रॅक्टीस देखील करत होता. परंतु, त्याला काही महिन्यांपुर्वी पोलिसांनी ड्रग्जप्रकरणात पकडले होते. नंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून शहरातील ड्रग्जची पाळेमुळे खोदून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीने अमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्त घाल असताना बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलसमोरील रोडवर एका कारमध्ये काहीजण थांबले असून, ते ड्रग्जची तस्करी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशी माहिती मिळाली.
माहितीवरून पथकाने या ठिकाणी छापा मारला. तसेच, तिघांना पकडले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता मोहमंद याच्याकडे ५ लाख ५ हजार रुपयांचा २९ ग्रॅम २९ मिलीग्रॅम एमडी हा अमली पदार्थ मिळाला. तर सॅम्युअल याच्याकडे ६ लाख ३८ हजार रुपयांचा एमडी मिळाला. त्यांच्याकडून कार, मोबाईल तसेच इतर ऐवज असा एकूण १५ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस आहेत.
हे सुद्धा वाचा : कानाखाली मारल्याच्या राग अनावर; लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
मोहमद शेख याला यापुर्वीच एक ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. तर, अनिकेत कुडले याला बंडगार्डन भागात ड्रग्जप्रकरणी पकडण्यात आले होते. त्यांनी हे ड्रग्ज कोठून आणले यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. मोहमंद शेख हा ओळखीतील काहींना ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.