आम्ही इथले भाई, माझी माफी माग, नाहीतर...; बारामतीत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
बारामती : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून, खून, हाणामाऱ्या, लुटमार, धमकावणे यासारखे प्रकार घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशातच आता बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती तालुक्यातील जळोची एमआयडीसी येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जळोची, एमआयडीसी रोडवरील जय शंकर पॉन शॉप समोर ही घटना घडली. फिर्यादी जय शंकर पॉन शॉप येथे थांबले असताना मोटार सायकल वरून सहा जण आले. यातील आरोपी जयेश बाबासाहेब माने (वय 20), प्रथमेश बाळू गवळी (वय 20), विनोद गणेश जाधव (रा. तांदुळवाडी, बारामती) आणि इतर चार अनोळखी साथीदार यांनी फिर्यादीला ‘तु गणेश वाघमोडे सोबत का फिरतोस..?’माझी माफी माग असे म्हणाले. त्यानंतर आरोपी प्रथमेश गवळी याने “याला ठेवायचे नाही” असे म्हणत हातातील कोयत्याने फिर्यादीवर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
अटक आरोपी जयेश माने हा गणेश धुळा बापू वाघमोडे हत्येच्या प्रकरणातील आरोपी असून, ऑगस्ट 2024 मध्ये बारामती शहरात त्याने साथीदारांसह वाघमोडेचा खून केला होता. त्यात तो अटक होऊन जेलमध्ये होता व दीड महिन्यापूर्वीच त्याची सुटका झाली होती. या दोन्ही टोळ्यांमध्ये जुलै 2023 मध्येही हिंसक वाद झाला होता. त्यावेळी जयेश माने याला मारहाण झाली होती व या घटनेत गणेश वाघमोडे, गौरव सुळ यांच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी जयेश माने आणि प्रथमेश गवळी हे अहिल्यानगर येथील रूई छत्तीशी गावात लपून बसले आहेत. पोलिसांनी तातडीने छापा टाकत दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास विक्रम पवार करत आहेत.
यांच्या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, सहायक फौजदार एस. जे. वाघ, पोलिस हवालदार खारतोडे, पोलिस हवालदार स्वप्नील अहिवळे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिस शि. होळंबे, शकील शेख आदींनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करत आहेत.