पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ फ्लेक्सबाजी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विडंबन काव्य करणार्या कुणाल कामराविरोधात विधानसभेत जोरदार वादंग झाल्यानंतर आता त्याचे समर्थन करणारा फ्लेक्स पुण्यातील अलका चित्रपटगृहाजवळील छत्रपती संभाजी महाराज पुलावर लावण्यात आला होता. हा फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञातावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजेंद्र भानुदास केवटे (वय ४२, रा. पर्णकुटी पायथा, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणे केले होते. त्यावरुन राज्यात गदारोळ सुरु आहे. कामरा याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. कामरा याचे समर्थन करणारा फ्लेक्स छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या कोपर्यावर लावण्यात आला आहे. या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याखाली ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा मजूकर लिहिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुणाल कामरा याचेही फ्लेक्सवर व्यंगचित्र काढले आहे. त्याच्याखाली शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर व त्यासोबत मशाल हे चिन्ह असलेला आक्षेपार्ह मजकूराचा फ्लेक्स कोणीतरी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या लावलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे तपास करीत आहेत.