पुण्यात दुकानातून 15 लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
पुणे : पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या एम. जी रोडवरील दुकानात मेफेड्रोन (एम. डी) हा अमली पदार्थ विक्री करणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाख ७० हजारांचा ७७ ग्रॅम एम. डी पावडर जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, दुकानात बसून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे समोर आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. हुसेन नुर खान (२१, रा. कोंढवा), फैजान अयाज शेख (२२, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार संदेश काकडे, रेहाना शेख व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
फैजान याचे एम.जी रस्त्यावरील कोळसा गल्ली येथे कि मेकर्सचे दुकान आहे तर हुसेन त्याचा ओळखीतील आहे. शहरात छुप्या पद्धतीने ड्रग्ज डिलर ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे पाहिला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. दोन दिवसांपुर्वीच येरवड्यात पोलिसांनी २३ लाखांचे एम. डी पकडले. त्या तस्काराचा साथीदार रेकॉर्डवरील आरोपी असल्याचेही तपासातून समोर आले होते. त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असतानाच अंमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्तीवर होते.
तस्करांचा शोध घेत होते. दरम्यान एम.जी रस्त्यावरील कोळसा गल्लीतील दूकानात दोघे थांबले असून त्यांच्याकडे एम.डी पावडर असल्याची माहिती अंमलदार विशाल दळवी यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून खान आणि शेखला ताब्यात घेतले. तपासात त्यांच्याकडे १५ लाख ७० हजारांचे ७७ ग्रॅम एम.डी पावडर मिळून आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : वाल्मिक कराडचं सोलापुरमध्येही घबाड; धक्कादायक माहिती समोर
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.