फलटणमधील 'त्या' खुनाचा छडा लागला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
सातारा : संदीप रिटे यांच्या खुनाची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने (वय २१) आणि सोमनाथ माणिक मदने (वय ३२, दोघेही, रा. बोडरेवस्ती, ठाकूरकी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक १० रोजी अज्ञात लाेकांनी संदीप मनोहर रिटे (रा. ठाकूरकी, ता. फलटण) यांचा निर्घृण खून केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. खुनाची घटना अतिशय गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवकर यांनी पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड, वैभव सावंत यांचे तपास पथक तयार करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना देऊन फलटणला पाठवले होते.
या पथकाने फलटण येथे जाऊन देवकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलटण शहर पोलिस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या समवेत तपास केला असता रिटे दिनांक १० रोजी सकाळी कामावर गेले होते, तेव्हापासून घरी आले नसल्याची माहिती मिळाली. घटनास्थळावरून माहिती घेतली असता झालेल्या प्रकाराबाबत काही माहिती मिळून येत नव्हती. मात्र तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करत होते.
साडेपाच लाख रुपयांची दिली सुपारी
दिनांक १२ रोजी देवकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, फलटण शहरातील मच्छी मार्केट येथे दिनांक १० रोजी सायंकाळी मृत संदीप रिटे व अज्ञाताचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्या अज्ञाताने महेश संदीप यांचा मोबाईल काढून घेऊन तो तिथून निघून गेला होता. त्याच्या पाठोपाठ मयत संदीप रिटे देखील गेले असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकाने वेशांतर करून तपासाची दिशा ठरवत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांचे जाळे तयार करून त्या अज्ञानाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या चुलत भावाच्या सांगण्यावरून साडेपाच लाख रुपयांची सुपारी ठरवून संदीप रिटे यांना जीवे मारल्यानंतर पैसे देण्याच्या अटीवर केला असल्याची कबुली दिली.