आंदेकर टोळीचा खेळ खल्लास; 27 बँक खाती पडताळली अन् लाखोंची मालमत्ता गोठवली
पुणे : टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणानंतर आता पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. बंडू आंदेकरच्या घर झडतीनंतर आता या खून प्रकरणातील एकूण आरोपींच्या २७ बँक खात्यांची पडताळणी केली असून, त्यातील ५० लाख ६६ हजार ९९९ रुपयांची रक्कम गोठवली आहे.
आंदेकर व गायकवाड टोळी युद्धातून पंधरा दिवसांपुर्वी (दि. ५ सप्टेंबर) आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन महिलांसह १५ जणांना अटक केली. यातील १२ पुरूषांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. तर, वनराज याची पत्नी सोनालीसह तीन महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आता आंदेकर टोळीच्या आर्थिक गोष्टींची माहिती देखील घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यानूसार पुणे पोलिसांनी आयुष कोमकर खूनप्रकरणात आरोपींच्या आंदेकर टोळीतील आरोपींची एकूण २७ बँक खाती पडताळण्यात आली आहेत. त्यात ५० लाख ६६ हजार ९९९ रुपयांची रक्कम आढळून आल्यानंतर ती गोठवण्यात आली आहे.
वनराजचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या रडारवर कोण-कोण होते हे तपासातून समोर आले आहे. वनराजचा खून करणारे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. त्यातील एका आरोपीच्या कुटूंबियाला टार्गेट करण्यात येणार होते. पण, त्यापूर्वी पोलिसांनी टेहाळणी करणाऱ्या काळेला पकडले आणि तो प्लॅन फसला. नंतर ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकरचा गोळ्या घालून खून केला होता. सध्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून यामध्ये पुरावे गोळा केले जात आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का ? या दृष्टीने अधिक तपास होण्यासाठी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
कृष्णा आंदेकरने लावली फिल्डिंग
टेहाळणी करणाऱ्या दत्ता काळे याला कृष्णा आंदेकर याने खोलीसाठी ५ हजार रुपये देऊन आंबेगाव पठार भागात पाठविले. नंतर ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता काळेने वनराज यांचा खून करणार्या आरोपींची घरे पाहिली. त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्यावेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. कृष्णाने कॉल न घेतल्याने काळेने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असे म्हटले होते. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता कृष्णाने काळेला कॉल करून सात ते आठ जणांना पाच ‘वेपन’ घेऊन पाठविले आहे, असे सांगितले होते.
वनराजचा खून करणाऱ्यांच्या घरांची रेकी
आंदेकर टोळीच्या सर्व सदस्यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात आंदेकर टोळीतील सदस्यांनी रेकी केल्याचा प्रकार समोर आला होता. वनराजच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह इतर आरोपींची घरे या परिसरात आहेत. त्यांच्या घरांची रेकी करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. पण, आता तो तपास पुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गुन्हे निखील पिंगळे यांनी दिली.