तडीपार गुंडासह चौघांना बेड्या, 4 पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
पुणे : तडीपार गुंडाचे वास्तव्य शहरातच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, नुकतेच याबाबत नवराष्ट्रने वृत्त दिले होते. त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, नंतर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणार्या सराईत गुन्हेगारांसह चौघांना एकाच वेळी अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाने त्यांच्याकडून ४ पिस्तूल व ८ जिवंत काडतूसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
वाघोली येथे एका मित्राच्या लग्नासाठी ते एकत्र आले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
गोपाळ संजय यादव (वय २४, रा. वाघोली), अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३, रा. वाघोली), इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली), देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, रा. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक गौरव देव, सुनिल पवार, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे यांच्यासह पथकाने केली आहे.
पटेल आणि पंदी यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. तर, यादव याच्यावर दरोडा, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. चारही आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. गोपाळ यादव हा वाघोलीतील राजेश्वरी नगरी भागात रहायला आहे. त्यांच्या एका मित्राचे लग्न असल्याने चौघेजण यादव याच्या घरी आले होते. यादरम्यान रेकॉर्डवरील आरोपी हे वाघोली भागात असून, दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार पिस्तूल व आठ काडतूसे आढळून आली. त्यानूसार पथकाने चौघांना अटक केली आहे.
तत्पुर्वी दैनिक नवराष्ट्रकडून तडीपार गुंडांचे शहरातच वास्तव्य असल्याचे वृत्त दिले होते. त्यात गेल्या तीन वर्षातील तडीपार गुंड व पुन्हा शहरात वास्तव्यास आल्यानंतर पकडलेल्या कारवाईचे आकडेच दिले होते. तसेच, तडीपार गुंड पुन्हा शहरात येत गुन्हे कसे करतात, याचेही उदाहरण दिले होते. त्यामुळे पोलिसांची तडीपारीची कारवाई फक्त कागदोपत्रीच असल्याचेही वास्तव दाखविले होते. पोलिसांनी पुन्हा दोन तडीपारांना अटक करून तडीपार गुंडाचे वास्तव पाहायला मिळत आहे.